शिवाजी पार्कातील विजयी जल्लोष मोर्चावरून शिंदे गटाची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका
Uddhav Thackeray Birthday News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेप्रमुख राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले असतानाच, दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर बोचरी टीका झाली आहे. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुंबईत विजयी जल्लोष साजरा करणाऱ्या ठाकरे बंधूंवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठाकरे बंधूंनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात भव्य विजयी मोर्चा काढला होता. या मोर्चाचा समाचार घेताना प्रकाश महाजन म्हणाले की, “महाराष्ट्राचे हे मोठे दुर्दैव आहे. ज्या ठाकरेंना एकेकाळी महाराष्ट्राचे कर्तेसमर्ते मानले जायचे, त्यांना आज स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी झुरळाला विष्णूचा अवतार म्हणावे लागत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ‘वाघ’ म्हटले जायचे, मात्र त्यांचा नातू आज स्वतःला ‘झुरळ’ म्हणवून घेतोय; मग त्यांच्या बापाला काय म्हणायचे?” असा थेट आणि अत्यंत तिखट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे बंधूंच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करताना महाजन पुढे म्हणाले, “मराठीच्या मुद्द्यावरून तरुणांना मारणारे आज मोर्चात हिंदी आणि इंग्रजीत भाषणे देत होते. राज ठाकरे यांच्यात संपूर्ण देशातील राजकीय वातावरण बदलण्याची ताकद आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना स्वतःच्या शक्तीची जाणीव राहिलेली नाही. त्यांनाही आज असा आधार घ्यावा लागतोय हे पाहून वाईट वाटते.”
जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत काढलेल्या या मोर्चावर महाजन यांनी “बडा घर आणि पोकळ वासा” अशी टीका केली. ठाकरे गटाची राजकीय पकड सैल होत चालल्यानेच त्यांना अशा प्रकारच्या आंदोलनांचा सहारा घ्यावा लागत असल्याचे सांगत, या प्रकारामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वेदना झाल्या असतील अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 28-07-2026














