आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई : Devendra Fadnavis On Student Protest संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून, NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील दाखल झालेले सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन आणि गृह विभागाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण सूचनांनंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याने आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील आंदोलनाचे लोण आणि पोलिसांची कारवाई
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या NEET पेपरफुटीविरोधी आंदोलनानंतर याचे पडसाद संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही उमटले होते. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने करत लाठीचार्ज आणि पेपरफुटीचा तीव्र निषेध नोंदवला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवण्याशी संबंधित विविध कलमांखाली विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जयंत पाटलांचे पत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची जोरदार मागणी केली होती. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे लोकशाहीला शोभणारे नाही, असे जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले होते. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयानेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना तातडीने सोडण्याचे निर्देश देत पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी स्वतंत्र ‘एसआयटी’ (SIT) स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.
सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांचा इशारा
याच पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि धमक्या देणे न थांबल्यास कॉकरोच जनता पार्टी (CJP) पुन्हा एकदा संपूर्ण देशात मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 29-07-2026














