Fishing News: खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाईट फोन; राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून बीएसएनएलच्या सहकार्याने उपक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ मच्छीमारांना फोनचे वितरण

मुंबई : Fishing News संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आता मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मत्स्य व्यवसाय विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मंत्रालयात योजनेचा शुभारंभ; प्रातिनिधिक वाटप पार पडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून या विशेष उपक्रमाचा शुभारंभ मंत्रालयात पार पडला. या कार्यक्रमाला भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ मच्छीमारांना अत्याधुनिक सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या सॅटेलाईट फोनद्वारे इनकमिंग आणि आउटगोइंग अशा दोन्ही प्रकारच्या संपर्काची सुविधा उपलब्ध असणार आहे.

मच्छीमारांची सुरक्षितता हीच सरकारची प्राथमिकता : नितेश राणे

या प्रसंगी बोलताना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील मच्छीमारांचे प्राण आणि त्यांची उपजीविका सुरक्षित ठेवणे ही राज्य शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खोल समुद्रात गेल्यानंतर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे मच्छीमारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत हा सॅटेलाईट फोन मच्छीमारांसाठी अत्यंत प्रभावी आणि जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल.

दुर्गम भागातही राहणार सातत्यपूर्ण संपर्क

कार्यक्रमादरम्यान BSNL च्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण केले. समुद्रातील दुर्गम भागातही याद्वारे सातत्यपूर्ण संपर्क कसा राखता येईल, याचे सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समुद्रात मोबाईल नेटवर्क नसतानाही संपर्क साधणे शक्य होईल. परिणामी, अचानक आलेले खराब हवामान, नौकेतील यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अथवा अन्य कोणत्याही संकटाच्या वेळी मच्छीमारांना तत्काळ मदत मागवणे अत्यंत सुलभ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 29-07-2026