जंतरमंतरवरील आंदोलनात जेन-जी (Gen-Z) सतर्कतेमुळे पोलीस उघडे पडल्याचा दावा; दीपके यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : Delhi Protest SOP Controversy संदर्भात दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान ‘जेन-जी’ (Gen-Z) युवा आंदोलकांनी पोलिसांचे संभाषण आणि कारवाईचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर उघड केल्यानंतर, दिल्ली पोलिसांकडून एक नवी एसओपी (SOP) जारी करण्यात आली आहे. भविष्यातील आंदोलनांमध्ये रेकॉर्डिंग झाल्यास काय करावे, यासंदर्भात पोलिसांनी ही नियमावली तयार केल्याचे समोर आले असून, यावरून ‘सीजेपी’ (CJP) आंदोलक अभिजित दीपके यांनी पोलिसांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. दीपके म्हणाले, “जर पोलिसांना रेकॉर्डिंग होण्याची भीती वाटत असेल, तर याचा अर्थ त्यांच्या मनात काहीतरी खोट आहे. आम्ही आमचे आंदोलन कॅमेऱ्यांसमोर आणि मीडियासमोर पारदर्शकपणे केले. पोलिसांनी कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या व्हॉट्सअॅप फॉरवर्डवर किंवा आदेशावर चालण्याऐवजी देशाच्या संविधानाचे तंतोतंत पालन केले पाहिजे.” पुढे बोलताना त्यांनी, “जर पोलिसांना संविधानाऐवजी भाजपचे आदेशच फॉलो करायचे असतील, तर त्यांनी आपली खाकी पँट काढून हाफ चड्डी घालावी आणि थेट भाजपच्या मुख्यालयाबाहेर उभे राहून ‘मै भी चौकीदार’ म्हणावे,” अशा अत्यंत कडक शब्दांत सुनावले.
यावेळी अभिजित दीपके यांनी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडींवर आणि कथित कटकारस्थानावर गंभीर आरोप केले. १९ जुलैच्या रात्री आणि २० जुलैच्या सकाळी जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक आल्याचे त्यांनी पाहिले व त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. आमचा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच फुटलेली व्हॅन उभी करण्यात आली होती. याबाबत जेव्हा डीसीपींची भेट घेऊन विचारणा केली, तेव्हा तिथे बांधकामासाठी हे दगड आणल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा सर्व प्रकार पोलीस आणि भाजपच्या गुंडांनी मिळून रचलेला पूर्व नियोजित कट होता, असा आरोप दीपके यांनी केला.
शेतकरी आंदोलन आणि सीएए-एनआरसी (CAA-NRC) आंदोलनादरम्यानही दिल्ली पोलीस आणि सत्ताधाऱ्यांचे अशाच प्रकारचे ट्युनिंग पाहायला मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
दुसऱ्या एका प्रश्नावर उत्तर देताना दीपके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केले. “शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे देशातील खूप मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांची भेट झाली असावी. शरद पवार हे जंतरमंतरवर आंदोलकांची विचारपूस करण्यासाठी आले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अनिश हा आपला जवळचा मित्र असून दिल्लीत आल्यावर आपण नेहमी त्याच्याच घरी मुक्कामाला असतो, असा खुलासाही दीपके यांनी अखेर केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 30-07-2026












