३८ वर्षीय अजिंक्य रहाणेची निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना अश्रू अनावर
मुंबई (विशेष बातमीदार): Ajinkya Rahane Retirement Video बाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक व्हीडिओ पोस्ट करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या यशस्वी प्रवासाला पूर्णविराम दिला. ३८ वर्षांचा अजिंक्य गेल्या काही काळापासून भारतीय संघाबाहेर होता. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
अजिंक्यने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हीडिओ शेअर करत एक संवेदनशील संदेश लिहिला आहे. “कॅप २७८ आता निरोप घेत आहे. इतक्या वर्षांत तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी कायम ऋणी राहीन,” अशा शब्दांत त्याने देश-विदेशातील चाहत्यांचे आभार मानले. व्हीडिओमध्ये बोलताना त्याचा घसा दाटून आला होता. बोलताना अडखळणारे शब्द आणि डोळ्यात आलेले अश्रू पाहून त्याचे लाखो चाहतेही भावुक झाले. “तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही, नेहमी आपल्या कुटुंबातील एक भाग मानलं,” असं म्हणताना अजिंक्यला आपले अश्रू रोखता आले नाहीत.
मुंबईच्या मैदानातून आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात करणाऱ्या अजिंक्यने कठीण परिस्थितीत भारतीय संघासाठी नेहमीच संकटमोचकाची भूमिका बजावली. परदेशी मैदानांवर, विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्याने खेळलेल्या महत्त्वपूर्ण खेळी क्रिकेटप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहतील. त्याच्या या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेट जगतातील एका शांत, संयमी आणि अत्यंत आदरणीय पर्वाचा अंत झाला आहे.
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि आकडेवारी:
- कसोटी क्रिकेट: ८५ कसोटी सामन्यांच्या १४४ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने आणि ४९.५० च्या स्ट्राइक रेटने ५०७७ धावा. यामध्ये २६ अर्धशतके आणि १२ शतकांचा समावेश असून १८८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
- कर्णधारपद: रहाणेने ६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने ४ सामने जिंकले, तर २ सामने अनिर्णित राहिले.
- एकदिवसीय क्रिकेट (ODI): ९० सामन्यांमधील ८७ डावांमध्ये ३५.२६ च्या सरासरीने आणि ७८.६३ च्या स्ट्राइक रेटने २९६२ धावा. यामध्ये २४ अर्धशतके आणि ३ शतके समाविष्ट आहेत.
- टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I): २० सामन्यांमध्ये ११३.२९ च्या स्ट्राईक रेटने ३७५ धावांची नोंद केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 30-07-2026












