दोन रिफिलमधील ४५ दिवसांची अट शिथिल करा; आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन जोडण्या देण्याची निवेदनाद्वारे विनंती
राजापूर : Ratnagiri LPG Cylinder Crisis च्या संदर्भात युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध रत्नागिरी जिल्ह्यासाठी तातडीने शिथिल करून पुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेता नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना त्वरित परवानगी द्यावी, यासाठी त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन रिफिल एलपीजी सिलेंडरमधील किमान कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. यासोबतच नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांवरही तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पारंपरिक लाकूड इंधनाचा वापर कमी करून स्वयंपाकासाठी एलपीजीचा स्वीकार केला आहे. शिवाय ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे अनेक घरांमध्ये सदस्यांची संख्या अधिक असते. अशा परिस्थितीत एका सिलेंडरवर ४५ दिवसांचा कालावधी काढणे अनेक कुटुंबांसाठी अशक्य होत असल्याचे जठार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कोकणातील होळी आणि विशेषतः महत्त्वाच्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे व इतर शहरांतून हजारो चाकरमानी आपल्या गावी परततात. या काळात घराघरांमध्ये एलपीजी सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. गणेशोत्सवात नवीन एलपीजी जोडण्या आणि रिफिल सिलेंडरची आवश्यकता अधिक भासत असल्याने हे निर्बंध अडचणीचे ठरत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामीण ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी कमी करून पूर्वीप्रमाणे करावा किंवा तो किमान २५ दिवसांचा निश्चित करावा. तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकृत एलपीजी वितरकांना नवीन घरगुती जोडण्या देण्यास तातडीने परवानगी द्यावी. याप्रकरणी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल कंपन्यांशी समन्वय साधून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:02 30-07-2026














