‘गूगल आयपीटीव्ही’ अॅपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन फसवणूक; शहर पोलिसांत अज्ञात भामट्यावर गुन्हा
रत्नागिरी (विशेष बातमीदार): Ratnagiri Cyber Crime संदर्भात रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे उघडकीस आले आहे. एका अज्ञात भामट्याने मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचे भासवत एका मेडिकल सेल्समनची २ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नाचणे रोड परिसरातील अभ्युदयनगर येथे घडलेल्या या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभ्युदयनगर येथे राहणारे ३४ वर्षीय नारायण दिनेश घोलप हे २९ जुलै २०२६ रोजी सकाळी आपल्या घरी उपस्थित असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक सिस्टीम अपडेटची प्रक्रिया सुरू झाली. त्याच दरम्यान त्यांच्या फोनमध्ये ‘गूगल आयपीटीव्ही’ हे अज्ञात अॅप आपोआप डाऊनलोड झाले.
या अॅपच्या माध्यमातून सायबर चोरांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे २ लाख ५० हजार रुपये, तसेच बचत खात्यावरून यूपीआयद्वारे ४ हजार २०० रुपये असा एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपयांचा निधी परस्पर लांबवला.
मोबाईलमधून पैसे कट झाल्याचा मेसेज आल्यानंतर पीडित तरुणाने तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
नागरिकांनी अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाईलवर येणाऱ्या संशयास्पद अपडेट किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच अनधिकृत ठिकाणाहून एपीके फाईल्स डाऊनलोड करू नयेत. फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 30-07-2026













