Sourav Das React To Kangana Ranaut Remarks: “मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो, म्हणून..”; कंगना रनौत यांच्या टीकेवर सौरव दास यांचा पलटवार

‘CJP’ प्रवक्ते सौरव दास यांची थेट कंगनावर टीका; शब्दांचा वापर जपून करण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली : Sourav Das React To Kangana Ranaut Remarks संदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन (Students Protest) थांबले असले, तरी भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना रनौत आणि ‘CJP’ चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस अधिक रंगताना दिसत आहे. कंगना रनौत यांनी ‘जेन-झी’ (Gen Z) आंदोलकांवर आणि सौरव दास यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर आता सौरव दास यांनी कंगना यांच्यावर जोरदार पलटवार करत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

यापूर्वी कंगना रनौत यांनी ‘जेन-झी’ मधील आंदोलकांना ‘जनरेशन गटार’ (Generation Gutter) असे संबोधत, त्यांचे व्हिडिओ पाहून मळमळल्यासारखे वाटते, अशी टीपणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सौरव दास यांनी, “कंगना यांना त्यांचा स्वतःचा पक्षच गांभीर्याने घेत नाही,” असा टोला लगावला होता. त्यानंतर संतापलेल्या कंगनाने सौरव दास यांना “हा विद्यार्थी वाटतच नाही, हा बेकार आणि बेरोजगार आहे” असे म्हणत निशाणा साधला होता. या सततच्या वाक्युद्धानंतर सौरव दास यांनी पुन्हा एकदा कंगनाला सडेतोड उत्तर दिले आहे.

‘द मोजो STORY’ युट्यूब चॅनलवर पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना सौरव दास यांनी स्पष्ट केले की, अभिनेत्री कंगना रनौत यांच्याशी त्यांचे कोणतेही वैयक्तिक वैर नाही. दास म्हणाले, “माझ्या मनात कंगनाबद्दल कोणताही आकस नाही. मात्र, त्या सातत्याने ‘जेन-झी’ आणि माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी करत आहेत. मी माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘अगं कंगना, जरा शांत हो… आपण एकत्र बसून यावर चर्चा करूया’. देशात सध्या चिंतन, चर्चा आणि संवादाचा अभाव ही मोठी समस्या बनली आहे.”

कंगना रनौत सातत्याने आपल्यालाच का लक्ष्य करत आहेत? याबद्दल बोलताना सौरव दास यांनी एक रंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “माझे मित्र मला मेसेज करून विचारत होते की, कंगना तुझ्यावर एवढी का चिडचिड करत आहे? त्यातल्या एका मित्राने मला सांगितले की, ‘तू तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखा दिसतोस, म्हणून कदाचित असे होत असावे.’ हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले, कारण तिच्यासारखी लोकप्रतिनिधी माझ्यासारख्या सामान्य माणसावर कशाला वारंवार टीका करेल?”

शेवटी सौरव दास यांनी कंगना यांना आपल्या शब्दांचा वापर जपून करण्याचा सल्ला दिला. “तुमची वक्तव्ये तीव्र नैराश्यातून आलेली वाटतात आणि ती मानसिकदृष्ट्या स्थिर व्यक्तीची वाटत नाहीत. देशातील नव्या पिढीबद्दल बोलण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. शेवटी जनतेची सेवा करण्यासाठीच तुमची निवड झाली असून, अशा प्रकारे जनतेचा किंवा तरुणांचा अपमान केला जाऊ शकत नाही,” असेही दास यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 30-07-2026