दापोली, कोल्हापूरसह मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवाई व आधुनिक बसेस दाखल; आणखी १०० जिजाऊ बसेसची मागणी
MSRTC Ratnagiri Depot (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग) अंतर्गत प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी व्यापक बदल करण्यात येत आहेत. रत्नागिरी विभागातील अत्यंत जुन्या आणि दुरवस्था झालेल्या तब्बल ४० एसटी बसेस स्क्रॅपमध्ये (भंगारात) काढण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागी आता ४८ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस, ९० ‘स्मार्ट लालपरी’ आणि ई-शिवाई बसेस कोकणातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी विभागात एसटी बसेसची मोठी दुरवस्था झाली होती. गळक्या छत्र्या, फुटलेल्या काचांच्या खिडक्या आणि मोडक्या आसनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता नव्या आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेल्या बसेस ताफ्यात दाखल झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक पाहायला मिळत आहे. गाडीत उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही यामुळे हळूहळू घटली आहे.
सध्या रत्नागिरी विभागात ४८ नव्या राजमाता जिजाऊ बसेससह ९० स्मार्ट बसेस आणि ३५ ई-शिवाई बसेस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. यात कोल्हापूर आगाराच्या ५ ई-शिवाई बसेसचाही समावेश आहे. विशेषतः रत्नागिरी-कोल्हापूर या डोंगरी आणि महत्त्वाच्या मार्गावर ई-शिवाई सुरू झाल्याने हा प्रवास अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक झाला आहे. याशिवाय दापोली आगारात ३४ ई-बसेस दाखल झाल्या असून मुंबई, पुण्यासह लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील उर्वरित नादुरुस्त बसेसही टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाण्याची शक्यता आहे. वाढती प्रवासी संख्या आणि आरामदायी प्रवासाची गरज लक्षात घेता, रत्नागिरी विभागासाठी महामंडळाकडे आणखी १०० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची अधिकृत मागणी करण्यात आली आहे. या नव्या बसेस ताफ्यात लवकरच दाखल झाल्यास कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 03-08-2026














