मोबाईल नेटवर्कअभावी ईटीआयएम मशीनवर कार्ड टॅप होईना; आधी नेटवर्क सक्षम करा, मगच सक्ती लागू करा – ग्रामीण भागातील प्रवाशांची तीव्र मागणी
आरवली / विशेष प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवासातील सवलतींची प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठी सुरू केलेली ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) स्मार्ट कार्ड योजना रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पार ठप्प पडल्याचे भीषण चित्र समोर आले आहे . या MSRTC NCMC Smart Card Issue मुळे स्मार्ट कार्डमध्ये ५०० ते १,००० रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम भरलेली असतानाही नेटवर्क नसल्याने कार्ड निष्क्रियांसारखे ठरत असून प्रवाशांना खिशातील रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी करावे लागत आहे .
गुहागर, लांजा, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात नेटवर्कची गंभीर समस्या
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि खेड यांसारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील बस मार्गांवर मोबाईल नेटवर्कची समस्या अत्यंत गंभीर आहे . इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने वाहकांच्या (कंडक्टरच्या) ईटीआयएम (ETIM) मशीनवर स्मार्ट कार्ड स्कॅन किंवा टॅप होऊन व्यवहार पूर्ण होत नाहीत . यामुळे शहरांमध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरणारी ही योजना ग्रामीण भागातील नेटवर्कच्या मर्यादांमुळे पूर्णपणे अडचणीत सापडली आहे .
प्रवासी अन् वाहकांमध्ये खटके; ‘आधी नेटवर्क, मग डिजिटल’ची घोषणा
कार्डमध्ये पैसे असूनही मशीन चालत नसल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे . ज्येष्ठ प्रवासी अझीझ वागळे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही कार्डमध्ये ८०० रुपये भरले आहेत, पण गावाकडच्या मार्गावर मशीन चालतच नाही. त्यामुळे रोज खिशातील पैसे देऊन तिकीट काढावे लागते, मग या कार्डचा उपयोग तरी काय?” .
दुसरीकडे मशीन काम करत नसल्याने प्रवाशांचा सर्व रोष वाहकांवर (कंडक्टर्स) निघत असून वरिष्ठांच्या सूचना आणि प्रवाशांची नाराजी या कात्रीत वाहकही अडकले आहेत . त्यामुळे जोपर्यंत ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा सक्षम होत नाही, तोपर्यंत ही योजना ऐच्छिक ठेवून पारंपारिक तिकीट पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे .
एमएसआरटीसीच्या अधिकृत योजना आणि घोषणांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी नागरिक MSRTC Official Website
वर भेट देऊ शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 05-08-2026














