खडी उतरवून केळशीकडे परतताना घडली घटना; रस्त्याची साईडपट्टी खचल्याने अपघात
दापोली:
दापोली तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. खडी खाली करून परतत असताना डंपर अंगावर उलटून झालेल्या अपघातात ३० वर्षीय चालक नवनीत भिसे (रा. केळशी, ता. दापोली) यांचा जागीच दाबले जाऊन मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत भिसे हे आयशर डंपरद्वारे (MH 08) खडी वाहतूक करण्याचे काम करत होते. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अडखळ परिसरात खडी रिकामी करून ते केळशीच्या दिशेने परतत होते. अडखळ बौद्धवाडी परिसरातून जात असताना रस्त्याची साईडपट्टी अचानक खचल्याने डंपरचा मागील भाग मातीत खोलवर रुतला.
डंपरची पाहणी करतानाच झाला घात
डंपर मातीत रुतल्यानंतर तो बाहेर काढण्यासाठी चालक नवनीत भिसे हे वाहनातून खाली उतरले. मात्र, वाहनाची पाहणी करत असतानाच अचानक बाजूची माती आणखी खचली आणि तोल गेल्याने डंपर थेट उजव्या बाजूला उलटला. दुर्दैवाने नवनीत भिसे हे थेट डंपरखाली दबले गेल्याने अत्यंत गंभीर जखमी झाले.
अपघात घडताच डंपरच्या क्लिनरने तातडीने डंपर मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना फोनवरून घटनेची कल्पना दिली. यानंतर मालक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने बचावकार्य राबवून नवनीत यांना डंपरखालून बाहेर काढण्यात आले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
गंभीर अवस्थेत नवनीत यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
नवनीत भिसे हे अत्यंत मेहनती आणि कर्तव्यदक्ष चालक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे केळशी आणि अडखळ परिसरावर शोककळा पसरली असून भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:52 07-08-2026














