पारदर्शक आणि मोफत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया; फसवणूक झाल्यास जिल्हा उद्योग केंद्राकडे तक्रार करण्याचे निर्देश
रत्नागिरी:
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही मध्यस्थ व दलालांकडून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा भुलथापांना बळी पडू नये व दलालांपासून सावध राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केले आहे. या योजनांची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व ऑनलाईन असून, यासाठी शासनामार्फत कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची नेमणूक करण्यात आलेली नाही.
लाभार्थ्यांच्या सोयीसाठी रत्नागिरी येथील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किंवा कर्ज प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कर्जाची मर्यादा आणि शासकीय अनुदान
- उत्पादन क्षेत्र: कमाल १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा.
- सेवा क्षेत्र: कमाल ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा.
- शासकीय अनुदान (सबसिडी): अर्जदाराचा प्रवर्ग (सामान्य/आरक्षित) आणि क्षेत्र (ग्रामीण/शहरी) यानुसार प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के ते ३५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान देय राहील.
- पात्रतेचे निकष: अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. तसेच १० लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या उत्पादन प्रकल्पांसाठी आणि ५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या सेवा व कृषी पूरक प्रकल्पांसाठी अर्जदार किमान ८ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
फसवणुकीची तत्काळ तक्रार करा
बँकेतून कर्ज मंजूर करून देण्यासाठी किंवा शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली जर कोणी मध्यस्थ पैशांची मागणी करत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची पैशांची मागणी अथवा फसवणुकीचा प्रयत्न होत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी त्याची तत्काळ लेखी अथवा प्रत्यक्ष तक्रार जिल्हा उद्योग केंद्र येथे करावी.
योजनेची सविस्तर माहिती, मार्गदर्शन व मोफत अर्ज सुविधा मिळवण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र (एमआयडीसी बिल्डिंग, जे. के. फाइल्स, बँक ऑफ इंडिया शेजारी, रत्नागिरी) येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा didic.ratnagiri@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अ. अ. आजगावकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 07-08-2026














