ब्रिटीशकालीन धोकादायक पुलावरून भंगाराची वाहतूक; संबंधित प्रशासकीय विभागांच्या ‘डोळेझाक’वर नागरिकांचा संताप
खेड:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत तसेच ऐतिहासिक जगबुडी नदीपात्राच्या अगदी जवळ भंगाराचे मोठमोठे ढिगारे साचल्याचे समोर आले आहे. भरणे नाका परिसरातील या बेकायदेशीर प्रकारामुळे जगबुडी नदीचे प्रदूषण वाढण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रालगत भंगार साठवणूक होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून याकडे साफ डोळेझाक केली जात असल्याचा तीव्र आरोप स्थानिकांमधून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून भरणे नाका परिसराची पाहणी केली असता, जगबुडी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर विविध टाकाऊ साहित्याचा व भंगाराचा साठा उघड्यावर साचल्याचे विदारक चित्र दिसून येते. पावसाळ्यात किंवा पुराच्या पाण्यात हा कचरा थेट नदीपात्रात वाहून जाऊन जगबुडी नदीचे पाणी दूषित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
ब्रिटीशकालीन पुलाचा व्यावसायिक वापर; अपघाताची भीती
विशेष म्हणजे, याच परिसरात असणारा ब्रिटीशकालीन जुना पूल आधीच अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, तरीही या धोकादायक पुलावरून सर्रासपणे जड वाहनांतून भंगाराची वाहतूक आणि व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
धोकादायक पुलावरून भंगाराची होणारी वाहतूक भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे या पुलाची सुरक्षितता आणि त्याचा होत असलेला बेकायदेशीर व्यावसायिक वापर यावर प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची जोरदार मागणी होत आहे.
प्रशासकीय यंत्रणा गप्प का?
नदीपात्र, राष्ट्रीय महामार्ग आणि धोकादायक पूल या तीनही दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भरणे नाका परिसरात भंगाराचे डोंगर उभे राहत असताना:
- महसूल विभाग (Revenue Department)
- पोलीस प्रशासन (Police Department)
- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
या सर्व जबाबदार विभागांच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष का जात नाही? की या गैरप्रकाराला प्रशासनाचा छुपा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल खेड तालुक्यातील नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 07-08-2026














