National Handloom Day: विलास रहाटे यांनी नाबार्ड कार्यालयात साकारलेली रांगोळी ठरली वेधक!

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुख्य कार्यालयात साकारली विशेष कलाकृती

रत्नागिरी: National Handloom Day (राष्ट्रीय हातमाग दिन) निमित्त मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नाबार्ड (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) मुख्यालयात ७ ऑगस्ट रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी साकारलेली रांगोळी उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. देशातील हातमाग विणकरांच्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हातमाग प्रदर्शन आणि कार्यक्रमात ही सुंदर कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे.

National Handloom Day ची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संकल्पना

राष्ट्रीय हातमाग दिनाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ७ ऑगस्ट १९०५ रोजी कोलकाता येथील टाऊन हॉलमध्ये ब्रिटिश शासनाविरोधात स्वदेशी चळवळीची अधिकृत सुरुवात झाली होती. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून भारत सरकारने ७ ऑगस्ट २०१५ रोजी पहिला राष्ट्रीय हातमाग दिन घोषित केला. या पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे पार पडले होते.

देशातील विणकर समुदायाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या राष्ट्रीय हातमाग दिनासाठी “हातमाग विणकरांचे सबलीकरण आणि माय हॅन्डलूम… माय प्राइड” ही विशेष संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

पारंपरिक हातमागावर वस्त्र विणणाऱ्या स्त्रीचे सुबक रेखाटन

या विशेष प्रसंगी नाबार्डच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात श्री. रहाटे यांनी साकारलेल्या रांगोळीत पारंपरिक हातमागावर वस्त्रे विणणारी स्त्री चित्रित करण्यात आली आहे. या स्त्रीने स्वतः हातमागावर तयार केलेली व आकर्षक नक्षीकाम असलेली साडी परिधान केल्याचे दृश्य रांगोळीतून अत्यंत जिवंतपणे साकारण्यात आले आहे. नाबार्डच्या वतीने आयोजित हातमाग प्रदर्शनासाठी उपस्थित राहिलेले विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि हातमाग प्रेमी नागरिकांकडून या रांगोळीचे कौतुक केले जात आहे.

Ratnagiri Khabardar add image

नाबार्डसाठी विलास रहाटे यांचे तिसरे रांगोळी प्रदर्शन

देवरूख येथील कलावंत विलास रहाटे यांनी नाबार्डच्या मुंबई मुख्यालयासाठी रांगोळी साकारण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सलग दोन वर्षे नाबार्ड कार्यालयात आकर्षक आणि संदेशात्मक रांगोळ्या साकारल्या होत्या. यावर्षी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने त्यांनी साकारलेली रांगोळी नाबार्ड परिसरातील प्रमुख आकर्षण ठरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 08-08-2026