Lanja News: लांजात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने वृद्धाचा मृत्यू

आडवली येथील घटना; लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

लांजा: Lanja News : लांजा तालुक्यातील आडवली येथील एका ७५ वर्षीय वृद्धाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम भागोजी खाके (वय ७५, रा. आडवली, ता. लांजा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांनी ५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास सततच्या आजारपणाला कंटाळून उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. औषध प्राशन केल्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र उलट्यांचा त्रास सुरू झाला.

उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात प्राणज्योत मालवली

उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतरही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील अतिद दक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आडवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 08-08-2026