MSRTC Bus Molestation Case: एसटी बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; एसटी वाहकावर कठोर कारवाई आणि निलंबनाची मागणी

माजी आमदार संजय कदम आक्रमक; खेड बसस्थानकात नागरिकांचा तीव्र संताप

खेड: MSRTC Bus Molestation Case (एसटी बसमधील विनयभंग प्रकरण): खेड तालुक्यात ७ ऑगस्ट रोजी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड-भरणे मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान संबंधित वाहकाकडून (कंडक्टर) हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीने केला आहे. या घटनेनंतर खेड तालुक्यात प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्याध्यापकांच्या तत्परतेमुळे पोलिसांत तक्रार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी शाळेत पोहोचल्यानंतर तिने प्रवासादरम्यान घडलेला प्रकार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधत अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून पीडित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवण्यासह एसटी प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे.

खेड बसस्थानकात नागरिकांची गर्दी; एसटी प्रशासनाला विचारला जाब

या घटनेची माहिती पसरताच स्थानिक नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने खेड बसस्थानक परिसरात एकत्र आले. बसस्थानकावर गोळा झालेल्या नागरिकांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सार्वजनिक प्रवासातील सुरक्षेबाबत एसटी महामंडळाने अधिक प्रभावी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली.

माजी आमदार संजय कदम यांचा आक्रमक पवित्रा

घटनेची माहिती मिळताच खेडचे माजी आमदार संजय कदम यांनी तातडीने खेड बसस्थानकात धाव घेतली. त्यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेत संबंधित वाहकावर तत्काळ निलंबनाची आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

पोलीस कारवाईत होणाऱ्या विलंबाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “दोषीवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देत महिलांच्या आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका माजी आमदार कदम यांनी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 08-08-2026