इन्फेक्शनमुळे प्रकृती बिघडल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज; कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन, चिपळूण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
चिपळूण: Chiplun News (चिपळूण दुर्दैवी घटना): शहरातील मार्कंडी परिसरातील एका बालरुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात हलगर्जीपणा झाल्याची चर्चा शहरात पसरल्यानंतर स्थानिक नागरिक, पत्रकार, नगरसेवक आणि डॉक्टर रुग्णालयात जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रियांश नवनीत नरळकर (वय ५ वर्षे, रा. परशुराम नगर, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय घडली?
परशुराम नगर येथील रहिवासी नवनीत नरळकर व त्यांच्या पत्नी साक्षी हे गुरुवारी सकाळी आपला मुलगा रियांश याला उपचारासाठी मार्कंडी येथील एका बालरुग्णालयात घेऊन गेले होते. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याला घरी नेण्यात आले. मात्र, दुपारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला दुसऱ्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले आणि प्रकृती स्थिर वाटल्याने पुन्हा घरी आणण्यात आले.
रात्री घरी खेळत असताना अचानक रियांशची प्रकृती अत्यंत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने पुन्हा मार्कंडी येथील बालरुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यवस्थ होती आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयात तणाव आणि डॉक्टरांची भूमिका
रियांशच्या मृत्यूची बातमी पसरताच नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली. वातावरण तापत असल्याचे पाहून चिपळूण पोलीस आणि ‘आयएमए’ (IMA) संघटनेचे पदाधिकारी डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले.
इन्फेक्शनमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन (Post-Mortem) आणि व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कामथे रुग्णालयात शवविच्छेदन; पोलीस तपास सुरू
एकाुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नरळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रियांशच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
या प्रकरणी तेजस नरळकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा रियांशचे पार्थिव कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 08-08-2026














