७ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष नियोजन
रत्नागिरी: MSRTC Ganeshotsav Extra Buses (गणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा फेऱ्या): कोकणातील गौरी-गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा ७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा विचार न करता प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्यात आला असून, या विशेष नियोजनाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
एसटी मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सण असून गणपती, कोकण आणि एसटी यांचे अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो चाकरमान्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसचे संचालन प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांातून केले जाणार आहे.
१० ऑगस्टपासून गट आरक्षण सुरू; ५०% व १००% भाडेसवलत लागू
या विशेष फेऱ्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळासह ‘MSRTC Bus Reservation’ मोबाईल ॲप आणि सर्व बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी ‘गट आरक्षण’ सुरू होणार आहे.
या विशेष फेऱ्यांमध्येही शासनाच्या योजनांनुसार महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना (७५ वर्षांवरील) १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी आणि महामार्गावर दुरुस्ती पथके तैनात
गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रमुख बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली कर्मचारी तैनात राहणार आहेत.
त्याचप्रमाणे, कोकणातील प्रमुख महामार्गांवर अचानक वाहनांमध्ये बिघाड झाल्यास तातडीने मदतीसाठी ‘वाहन दुरुस्ती पथके’ (ब्रेकडाऊन व्हॅन) सज्ज ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने व्यापक नियोजन पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 08-08-2026














