Chiplun Illegal Liquor Complaint: चिपळूणातील अवैध दारूधंद्यांविरोधात थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांची आक्रमक भूमिका; गांजा, बनावट दारू व हातभट्टीविरोधात स्वतंत्र चौकशीची मागणी


चिपळूण (विशेष प्रतिनिधी):
Chiplun Illegal Liquor Complaint प्रकरणी चिपळूण तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू, गोवा बनावटीची दारू, गांजा व इतर अमली पदार्थांच्या सर्रास विक्रीविरोधात त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे. तालुक्यातील या अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

तरुणांचे भविष्य अन् महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
पत्रात नमूद केल्यानुसार, चिपळूण तालुक्यातील विविध गावांमध्ये बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री केली जात आहे. याशिवाय गोवा बनावटीची दारू, गांजा आणि इतर अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक पातळीवरून सातत्याने प्राप्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक वाद, मारहाण, आर्थिक शोषण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ अवैध दारू विक्रीपुरता मर्यादित नसून तरुणांचे भविष्य, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक सुरेशी थेट संबंधित असल्याचे प्रवीण जाधव यांनी स्पष्ट केले.

मूळ सूत्राधारांवर कारवाई अन् गोपनीय तक्रार यंत्रणेची मागणी
संबंधित विभागांकडून वेळोवेळी कागदोपत्री कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी काही दिवसांतच हे धंदे पुन्हा सुरू होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेते किंवा छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करून थांबण्याऐवजी मोठ्या हातभट्टी चालकांवर, पुरवठादारांवर आणि संपूर्ण अवैध विक्री साखळीच्या मूळ सूत्राधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

शाळा व महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात यावी, नागरिकांच्या तक्रारींसाठी गोपनीय तक्रार यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच आतापर्यंत झालेल्या कारवायांची स्वतंत्र पडताळणी करून प्रशासनाने या धंद्यांवर नियमित देखरेख ठेवावी, अशा विविध मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 14-08-2026