मुंबई गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई; औषध निरीक्षक (Food & Drug Inspector) पदासाठी आता नव्याने होणार फेरपरीक्षा
मुंबई
देशभरात गाजलेल्या ‘नीट’ परीक्षा गैरप्रकारानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पेपरफुटीप्रकरणी मोठे वादंग पेटले आहे. अन्न व औषध प्रशासनातील ‘औषध निरीक्षक, गट-ब’ (Food & Drug Inspector) पदाच्या चाळणी परीक्षेत झालेला पेपरफुटीचा प्रकार एका प्रेमप्रकरणातील वादानंतर चव्हाट्यावर आला आहे. या गंभीर प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे आणि इतर दोन अधिकाऱ्यांसह एकूण ६ जणांना अटक केली आहे. दरम्यान, या गैरप्रकारामुळे एमपीएससी आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द केली असून लवकरच फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे.
ब्रेकअप अन् तक्रार; प्रेमाच्या वादातून फुटला पेपर
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा देणाऱ्या ऋतुजा पाटील या परीक्षार्थीसाठी तिच्या वडिलांनी (अमृत पाटील) प्रवीण पाटील नावाच्या दलालामार्फत परीक्षेच्या दोन दिवस आधीच पेपर फोडला होता. ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी तो आपला प्रियकर गौरव पाटील यालाही दिला.
परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ऋतुजा पाटील ही फूड इन्स्पेक्टर पदासाठी पात्र ठरली. मात्र, त्यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात टोकाचे वाद होऊन दोघांचे ब्रेकअप झाले. या रागातून गौरवने थेट ‘एमपीएससी’ आयोगाकडेच कागदपत्रांसह पेपरफुटीची तक्रार केली. त्यानंतर त्याने पुन्हा ईमेल करून हा बनाव असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गौरव पाटील याला अटक केली असून ऋतुजा पाटील हिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह ६ जणांना अटक
या पेपरफुटीप्रकरणी विरोधी पक्षातील खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime Branch) तपासाला वेग दिला. प्राथमिक तपासात उमेदवाराला प्रश्नसंच मिळून गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, गुन्हे शाखेने बुधवारी एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडवे यांच्यासह आयोगाच्या ३ अधिकाऱ्यांना आणि दलालांना अशा एकूण ६ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
भरती प्रक्रिया रद्द; नव्याने होणार फेरपरीक्षा
२२ मार्च २०२६ रोजी राज्यातील ६ विभागीय मुख्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीने ही चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. १२ जून रोजी निकाल लागल्यानंतर मुलाखती पार पडून २२ जुलै २०२६ रोजी ४८८ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, गैरप्रकार सिद्ध झाल्याने आयोगाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द केली आहे.
- उमेदवारांना दिलासा: या परीक्षेसाठी पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नवीन अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
- फी माफी: फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
- नवी तारीख: फेरपरीक्षेची सुधारित तारीख एमपीएससी आयोगातर्फे स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे लवकरच जाहीर केली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 27-08-2026














