शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची एमआयडीसीत धडक कारवाई; दुचाकीसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाचणकर चाळीसमोर कारवाई करत ९ हजार रुपये किमतीच्या गांजासह एका २४ वर्षीय युवकाला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांची धाड
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज परशुराम नंदीवले (वय २३, मूळ रा. पाचवड वाई, जि. सातारा; सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
मंगळवारी दुपारी गुन्हे प्रकटीकरण पथक एमआयडीसी परिसरात नियमित गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना संशयित सुरज नंदीवले हा अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने तेथे थांबल्याचा संशय आला. पोलिसांनी त्याची तातडीने झडती घेतली असता त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचा १७८.५ ग्रॅम गांजा आढळून आला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळावरून १७८.५ ग्रॅम गांजा आणि संशयिताची ५५ हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची दुचाकी (MH-08-AZ-1575) असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तस्करावर व अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयितावर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस (NDPS) कायदुकंअन्वये कलम ८ (क), २० (ब) (२) आणि (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इतर साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिस संशयिताची अधिक चौकशी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 27-08-2026














