MPSC Paper Leak? औषध निरीक्षक’नंतर आता MPSC राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा मार्किंग पॅटर्न आणि पेपर फुटल्याचा आरोप; आमदार रोहित पवार आक्रमक

नवी मुंबई पोलिसांचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर न केल्याने आयोगावर संशय; २९ ऑगस्टला अंतिम सुनावणी

MPSC पेपरफुटीचा आरोप पुन्हा एकदा समोर आल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर, आता राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) परीक्षेचा मार्किंग पॅटर्न आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ठराविक उमेदवारांना फायदा पोहोचवण्यासाठी यामध्ये लाखो रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी काही उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत नवी मुंबई पोलिसांनी दिलेला गोपनीय अहवाल लोकसेवा आयोगाने न्यायालयात सादर केला नाही, त्यामुळे आता २९ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.

काय आहे नवी मुंबई पोलिसांचा गोपनीय अहवाल?

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवला होता.

  • सहसचिव दोषी असल्याचा दावा: सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीअंती आयोगाचे सहसचिव आणि इतर काही अधिकारी-कर्मचारी दोषी आढळले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
  • अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप: औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांची नावे होती, त्यांनीच या परीक्षेत घोळ घातल्याचा आरोप केला जात आहे. अहवाल न्यायालयात सादर न केल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

MPSC पेपरफुटीचा आरोप: व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा

नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत नमूद केल्यानुसार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा झाली होती.

मात्र, परीक्षेच्या एक आठवडा आधीच दोन पेपरमधील प्रश्नांचे अधिकृत फोटो व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फिरत होते. प्रत्यक्ष परीक्षेत आलेले अनेक प्रश्न या फोटोंशी तंतोतंत जुळत असल्यामुळे समान संधीच्या तत्त्वाचा भंग झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा व निकाल पूर्णपणे रद्द करून पारदर्शकपणे नवीन परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 28-08-2026