फटाका व ट्रिपल सायलेन्सर जप्त; हुल्लडबाज दुचाकीस्वारांचे दाणाणले धाबे
रत्नागिरी: Ratnagiri Police Modified Silencer Action उपक्रमांतर्गत शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी अखेर कडक कारवाईचा बडगा उभारला आहे. शहर परिसरात राबवलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी १० दुचाकींचे फटाका व ट्रिपल सायलेन्सर जागीच जप्त केले असून, नियम मोडणाऱ्या चालकांकडून तब्बल २९,००० रुपयांचा दंडात्मक वसूल केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या हुल्लडबाजांचे धाबे चांगलेच दाणाणले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी लावली नाकाबंदी
शहरातील मुख्य रस्ते, निवासी भाग, शाळा-कॉलेज परिसर आणि बाजारपेठेच्या ठिकाणी काही तरुण दुचाकींना बेकायदेशीरपणे मॉडिफाइड (बदललेले) सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात गाड्या पळवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना या कर्णकर्कश आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये अचानक ‘नाकाबंदी’ आणि तपासणी मोहीम हाती घेतली.
बेकायदेशीर सायलेन्सर काढले; दंडाचा दणका
तपासणीदरम्यान ज्या दुचाकींना कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून बेकायदेशीर, जादा आवाजाचे मफलर बसवले असल्याचे आढळले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. वाहनांचे हे कर्कश्य सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले आणि संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नियम मोडणाऱ्यांवर सातत्याने होणार कारवाई; पोलिसांचा इशारा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषण पसरवणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्कश्य आवाज काढणारे सायलेन्सर बसवणे हा गुन्हा आहे. आगामी काळातही शहरातील विविध भागात अशी धडक मोहीम सातत्याने सुरूच राहील, असा सज्जड इशारा रत्नागिरी शहर पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सुजाण रत्नागिरीकरांमधून जोरदार स्वागत केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 29-08-2026














