जन्म दाखल्यासाठी वर्षभर हेलपाटे; ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात गैरहजर राहिल्याने कामे खोळंबली
माखजन :
Devrukh Panchayat Samiti च्या गलिच्छ आणि भोंगळ कारभाराबाबत संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक असणारा जन्म दाखला मिळवण्यासाठी वर्षभरापासून पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागत असून, वारंवार निवेदने देऊनही प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अधिकारी गैरहजर; कार्यालयांना कुलूप लागल्याने नागरिकांचे हाल
संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या देवरुख पंचायत समितीअंतर्गत अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवक आठवड्यातून एकदाही कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. बहुतांश वेळा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूपच लागलेले असते, ज्यामुळे नागरिकांची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. या अनास्थेमुळे संतप्त ग्रामस्थांनी देवरुख पंचायत समितीच्या या गलथान कारभाराची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये व्हावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वर्ष उलटले तरी मिळेना दाखला; रोजगाराचा होतोय बुडगा
जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला आणि घरपट्टी पावती यांसारख्या दैनंदिन कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. जन्म दाखल्यासाठी अर्ज करून वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी दाखला न मिळाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शाळा प्रवेश, ओळखपत्र आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जन्म दाखला अत्यंत महत्त्वाचा असल्याने या विलंबाचा थेट फटका विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना ‘उद्या या’, ‘परवा या’ असे सांगून परत पाठवले जात असून रोजगाराचा दिवस बुडवून पंचायत समितीत येणाऱ्या गरीब नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
माजी पंचायत समिती सदस्यांचा आंदोलनाचा इशारा
माजी पंचायत समिती सदस्य जाकीर शेकासन यांनी या भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. “देवरुख पंचायत समितीचा कारभार महाराष्ट्रातील विक्रमी गलथान कारभार ठरवा, इतकी परिस्थिती गंभीर आहे. अधिकारी शासनाचा पगार घेत असताना कामाच्या ठिकाणी हजर राहत नसतील, तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुढील आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, अधिकारी नियमित कार्यालयात हजर राहिले नाहीत आणि प्रलंबित दाखल्यांचा निपटारा झाला नाही, तर देवरुख पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जाकीर शेकासन यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 29-08-2026














