श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा संस्थेचा संयुक्त उपक्रम; क्रीडारसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी:गोकुळ अष्टमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठेची व मानाची ‘राधाकृष्ण श्री–२०२६’ जिल्हास्तरीय उंची गट शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच ‘राधाकृष्ण श्री–मेन्स फिजिक्स–२०२६’ या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज, रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी येथे लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नवोदितांसाठी ‘उगवता तारा’ विशेष पुरस्कार
या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित शरीरसौष्ठवपटूंसह नवोदित खेळाडूही आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘बेस्ट पोझर’ आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘उगवता तारा’ या विशेष पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे.
आकर्षक पारितोषिके आणि खेळाडूंना सुविधा
विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके, मानाचा विजेतेपदाचा पट्टा, भव्य ट्रॉफी व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. रत्नागिरी तालुक्याबाहेरून येणाऱ्या स्पर्धकांना एका वेळेचे एस.टी. प्रवासभाडे आणि सर्व सहभागी खेळाडूंसाठी रात्रीच्या भोजनाची विशेष व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
क्रीडारसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या भव्य आयोजनामुळे रत्नागिरीतील क्रीडा क्षेत्रात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैश्य युवा संस्थेचे सौरभ शेठ मलुष्टे, ऋषी धुंदूर, सचिन केसरकर, मनोर दळी, मुकुल मलुष्टे, अभिज्ञन्य वणजू, वेदांग मलुष्टे आणि इंद्रनील रेडिज परिश्रम घेत आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, कार्याध्यक्ष विरेंद्र शेठ वणजू व सेक्रेटरी जितेंद्र नाचणकर यांच्याशी संपर्क साधावा.













