लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; रविवार, ६ सप्टेंबर रोजी भव्य गौरव सोहळा

शिक्षक दिनानिमित्त ७ गुणवंत शिक्षकांचा होणार सन्मान; लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार कार्यक्रम

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने गेल्या २५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत, यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी लायन्स आय हॉस्पिटल (नेत्र रुग्णालय), रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्यास गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, रीजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरमन ला. शिल्पा पानवलकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष सुमित ओसवाल, सचिव ललित शहा व खजिनदार प्रदीप हरचिकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पुरस्कारार्थी शिक्षकांची नामावली

शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य, विद्यार्थ्यांसाठी घेतलेले विशेष परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी या निकषांच्या आधारे शिक्षण समिती अध्यक्ष लायन शिल्पा पानवलकर व समिती सदस्यांनी खालील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे:

  • कै. ल. ग. पटवर्धन स्मरणार्थ (लायन एच. एल. पटवर्धन पुरस्कृत):
    • सौ. गीताली शिवलकर – परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विभाग
    • श्री. मोहन भास्कर बापट – फाटक हायस्कूल
    • श्री. योगेश मोरबाळे गांगण – केळकर कॉलेजद्वारा फाटक हायस्कूल
  • सौ. राजश्री गडकरी स्मृतिप्रीत्यर्थ (लायन शिल्पा पानवलकर पुरस्कृत):
    • सौ. प्रज्ञा काळे – आनंदी परशुराम अभ्यंकर बाल मंदिर
  • श्री. अविनाश मोरे स्मृतिप्रीत्यर्थ (ला. साक्षी धुरी पुरस्कृत):
    • सौ. ममता गावडे – अंगणवाडी सेविका, शिरगाव
  • पै. हुसैनखान फडनाईक स्मृतिप्रीत्यर्थ (ला. ॲड. शबाना वस्ता पुरस्कृत विशेष पुरस्कार):
    • प्रा. बाबासाहेब सुतार
  • सौ. अलका देव स्मृतिप्रीत्यर्थ (लायन डॉ. शिवानी पानवलकर पुरस्कृत):
    • सौ. शर्वरी करगुटकर – विज्ञान विभाग, जिल्हा परिषद शाळा, मेरवी

२५ वर्षांची अखंड परंपरा

शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचा पाया असून, त्यांच्या अविरत योगदानाचा सन्मान करणे ही समाजाची बांधिलकी आहे. याच उद्देशाने लायन्स क्लब गेल्या २५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या पुरस्कार सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते आणि लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.