Road Repair Demand in Chiplun: चिपळूणातील रस्त्यांची डागडुजी गणेशोत्सवापूर्वी करण्याची मागणी; नगरपरिषदेला निवेदन

गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता स्वतंत्र पार्किंग व्यवस्था व पथदीपांची सोय करण्याची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांचा पुढाकार

चिपळूण, रत्नागिरी: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, तसेच गणेशभक्त आणि नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहरात नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन सादर केले आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुका आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे उत्सवाच्या काळात नागरिक व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत व आवश्यक तिथे डागडुजी करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग व अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी मिलिंद कापडी यांनी केली. याशिवाय वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रणे हटवावीत, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच गणेशोत्सवाच्या मार्गांवर पथदीप, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित
निवेदन देताना जयद्रथ खताते, शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, नगरसेवक योगेश पवार, अदिती देशपांडे, शहनाज वांगडे, माजी जि. प. सदस्या दिशा दामोळकर, उदय ओतारी, शिवानी पवार, सचिन साडविलकर, सचिन पाटेकर, समीर जानवलकर, दादू गुडेकर, पूनम भोजने, पूर्वा आयरे, रवीना गुजर, संदीप जागुष्टे, मनाली जाधव, मनोज जाधव, मीरा नारकर, सेजल कारेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 03-09-2026