दप्तराचे वजन नियमात ठेवण्यासाठी ‘बॅग टाइमटेबल’ तयार करण्याचे निर्देश; नियमांचे उल्लंघन झाल्यास शाळा तपासणीत कारवाईचा इशारा
पुणे: विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दप्तराच्या अतिरिक्त वजनाचा विपरीत परिणाम होऊ नये आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व कृतिप्रधान व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये, अशी दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, यासंबंधीची काटेकोर तयारी करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मान्यताप्राप्त खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ मधील तरतुदींची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी दररोज अनावश्यक पुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणू नये, तसेच दैनंदिन वेळापत्रकानुसार आवश्यक असलेलीच पुस्तके व साहित्य वर्गात आणावे, यासाठी वर्गनिहाय ‘बॅग टाइमटेबल’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळांच्या अचानक तपासण्या व नोंदींची पडताळणी
शाळांमध्ये या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांना शाळांना अचानक भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन, पुस्तके-वह्यांची संख्या, ‘बॅग टाइमटेबल’, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दप्तरविरहित दिवसांची अंमलबजावणी, पालकांना दिलेले मार्गदर्शन आणि दप्तर वजन तपासणी नोंदवहीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
सहावी ते आठवीसाठी १० दिवस ‘बॅगलेस’ उपक्रम
दप्तराचे ओझे कमी करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून १० दिवसांचा ‘दप्तरविरहित’ (बॅगलेस) कालावधी नियोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत स्थानिक कारागीर, व्यावसायिक आणि कौशल्याधारित व्यक्तींच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणारे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी, हस्तकला, कला, कृषीविषयक उपक्रम आणि स्थानिक व्यवसायांची ओळख यांचा समावेश आहे.
याशिवाय क्रीडा, प्रश्नमंजूषा, वाचन-कथाकथन, स्थानिक कला-संस्कृती, परिसर अभ्यास, क्षेत्रभेट आणि पर्यावरण संवर्धन यांसारखे विविध दप्तरविरहित उपक्रम वर्षभरात आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 03-09-2026














