तायक्वांदो क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल; रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण
रत्नागिरी: Prashant Makwana Award संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरी, सातत्यपूर्ण योगदान आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत रत्नागिरीचे सुपुत्र प्रशांत मनिषा मनोज मकवाना यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार – २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रशांत मकवाना यांनी तायक्वांदो क्रीडा प्रकारात खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करण्याबरोबरच प्रशिक्षक आणि पंच म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच २nd DAN ब्लॅक बेल्ट धारक आहेत. तायक्वांदोच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या मानाच्या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्या सामंत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रशांत मकवाना यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जिल्हा तायक्वांदो संघटना आणि गणराज तायक्वांदो क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह रत्नागिरीकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 03-09-2026














