MSEDCL Fraud Case in Ratnagiri: महावितरणची फसवणूक; जुना स्टॅम्प पेपर एडिट करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

टेंडरसाठी बनावट डिक्लेरेशन बाँड तयार करून दिशाभूल; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद

रत्नागिरी: पूर्वीच्या टेंडरसाठी वापरण्यात आलेल्या स्टॅम्प पेपरची पीडीएफ (PDF) फाईल एडिट करून महावितरण परिमंडळ कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी एका कंत्राटदाराविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीची ही घटना २७ डिसेंबर २०२५ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत महावितरण परिमंडळ कार्यालय, नाचणे (रत्नागिरी) येथे घडली. अतुल शिवाजी बेले (रा. मिरज, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कंत्राटदाराचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अनुराधा सुरेशराव आंधनंसरे (४५, मूळ रा. नाशिक, सध्या रा. थिबा पॅलेस रोड, जैन कॉलनी, रत्नागिरी) यांनी १ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अशी केली फसवणूक
पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, संशयित कंत्राटदाराने त्याला यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या टेंडरसाठी वापरलेल्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या पीडीएफ फाईलमध्ये डिजिटल फेरफार (बदल) केले. त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर नवीन टेंडरचा मजकूर लिहिला. नवीन टेंडर मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची व महावितरणची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा बनावट स्टॅम्प टेंडरसाठी ‘डिक्लेरेशन बाँड’ म्हणून महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केला.

याप्रकरणी महावितरणच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कंत्राटदार अतुल बेले याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 03-09-2026