Ganesh Utsav Transport Guidelines: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची लूट थांबवण्यासाठी रत्नागिरीत कडक पावले; अवाजवी भाडे आकारल्यास थेट कारवाई

रेल्वे स्थानक आणि रिक्षा थांब्यांवर भाडेदराचे फलक लावण्याचे निर्देश; तक्रारींसाठी प्रशासनाकडून ई-मेल आयडी जाहीर

Ganesh Utsav Transport Guidelines : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस, परिवहन विभाग आणि रिक्षा-बस वाहतूकदार संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अवाजवी भाडे आकारून होणारी लूट, जादा प्रवासी वाहतूक अथवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

रिक्षा आणि बस वाहतूकदारांसाठी प्रशासनाचे नियम प्रवाशांकडून कोणत्याही परिस्थितीत अवाजवी भाडे आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. प्रवाशांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील रेल्वे स्थानके व प्रमुख रिक्षा थांब्यांवर परिवहन विभागाने निश्चित केलेल्या रिक्षा भाडेदराचे फलक लावले जाणार आहेत. याशिवाय, रिक्षा स्टँडवर वाहने शिस्तबद्ध रीतीने उभी करावीत, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये आणि प्रवाशांशी सौजन्याने वागावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सुरक्षा साधने आणि चालकांवर फौजदारी कारवाईचा इशारा बसधारकांनी वाहनात आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसेसच्या सुटण्याच्या वेळेचे काटेकोर नियोजन बस मालकांनी करणे बंधनकारक राहील. चालकाने मद्यप्राशन करून अथवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास चालक आणि संबंधित बस मालक या दोघांवरही थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तक्रारीसाठी प्रशासनाचा ई-मेल आयडी जाहीर प्रवासादरम्यान कोणत्याही रिक्षा किंवा बस वाहतूकदाराने अवाजवी भाडे आकारल्यास अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्यास नागरिकांनी वाहनाचा क्रमांक व प्रवासाच्या तपशिलासह dyrto.08-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रमुख अधिकाऱ्यांची बैठकीस उपस्थिती या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, महामार्ग पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांच्यासह रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 03-09-2026