रंगीबेरंगी फुले, तोरणे आणि लायटिंगला वाढती मागणी
Ganesh Utsav Devrukh Market : कोकणातील सर्वात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे वेध आता कोकणवासीयांना लागले आहेत. देवरुख शहरासह साडवली व आसपासच्या ग्रामीण भागात गणरायाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे ओढ वाढू लागल्याने देवरुख मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.
सजावट साहित्याने बाजारपेठ सजली गणेशमूर्तीच्या आगमनापासून ते घरगुती आरास व सजावटीपर्यंत लागणाऱ्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. गणेशोत्सवातील सजावटीसाठी आवश्यक असलेली रंगीबेरंगी फुले, आकर्षक मखरे, तोरणे, विविध प्रकारची लायटिंग, कापडी पडदे आणि साउंड सिस्टीम यांसारखे साहित्य देवरुखच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. व्यापाऱ्यांनीही दुकानांमध्ये साहित्याची आकर्षक मांडणी केल्याने संपूर्ण बाजारपेठ रंगीबेरंगी साहित्यांनी सजली आहे.
चाकरमान्यांच्या आगमनाने देवरुखमध्ये वाढणार गर्दी कोकणातील गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा, घराघरातील आकर्षक सजावट आणि आरतीचा उत्साह अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांमधून चाकरमानी गावाकडे निघण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत चाकरमान्यांचे आगमन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर देवरुख व साडवली परिसरातील खरेदीला अधिक उधाण येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 03-09-2026














