Guhagar Bus Stand: गुहागरातील आगारामध्ये विद्यार्थी, प्रवाशांचे हाल; मध्यस्थीनंतर एसटी वाहतूक पूर्ववत

गुहागर बस स्थानक परिसरात थांब्यांच्या वादातून बंद पडलेली बससेवा अखेर सुरू

गुहागर, रत्नागिरी:

गुहागर बस स्थानक (Guhagar Bus Stand) परिसरात गुरुवारी मुंबई-पुणेसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी हॉटेल थांबा मिळत नसल्याच्या कारणावरून अचानक एसटी बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले. या गोंधळामुळे आगारामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन गैरसोय झाली. अखेर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे व सहकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत एसटी प्रशासनाशी चर्चा केली. तब्बल ५ तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सेवा सुरळीत करण्यात यश आले.

अधिकृत जेवण थांबा आणि कारवाईच्या भीतीमुळे चालकांचा रिबुक करण्यास नकार

गुहागर बस स्थानक आणि चालकांच्या मागण्यांची पार्श्वभूमी

गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून गुहागर आगारातून मुंबई व पुणे मार्गावर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुटत नव्हत्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी अधिकृत हॉटेल थांबा नसणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एखाद्या हॉटेलवर थांबल्यास परिवहन मंडळ दंडात्मक कारवाई करत असल्याने चालक व वाहकांनी गाड्या रिबुक करण्यास नकार दिला होता. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील या प्रदीर्घ वादामुळे एसटी फेऱ्या ठप्प झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागले.

लोकप्रतिनिधींची मध्यस्थी आणि वरिष्ठ पातळीवरील समन्वय

सकाळी गाड्या सुटत नसल्याचे समजताच पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, संदीप गोरिवले, उपसरपंच सचिन ओक, रवींद्र कारकर, जावेद केळकर, सुदर्शन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगारात धडक दिली. त्यांनी गुहागर आगार प्रभारी व्यवस्थापक स्वप्निल शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता विद्युत पुरवठा खंडित असणे, डिझेल अडचण व जनरेटर नसल्याची प्राथमिक कारणे देण्यात आली. मात्र, सखोल चौकशीअंती हॉटेल थांब्याचा खरा वाद समोर आला.

यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन आणि रत्नागिरी विभाग नियंत्रकांशी दूरध्वनीवरून तातडीने संपर्क साधला. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जेवणासाठी अधिकृत थांबा मिळवणे आणि झालेल्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून आश्वासन मिळाल्यानंतर ५ तासांनी एसटी गाड्या सोडण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 05-09-2026