- मार्गताम्हाणे, कौंधारताम्हाणे, उमरोली व ढोकरावली परिसरात नाचणी पिकाचे नुकसान; नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन
चिपळूण:
Chiplun Finger Millet Snail Pest Outbreak आणि कृषी क्षेत्रातील नव्या संकटाने चिपळूण तालुक्यातील नाचणी उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. तालुक्यातील काही भागांत, विशेषतः मार्गताम्हाणे खुर्द, कौंधारताम्हाणे, उमरोली, ढोकरावली आणि खांडोत्री या गावांमध्ये काही ठिकाणी नाचणीच्या पिकावर शंखी गोगलगायीचा (Giant African Snail) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. त्यामुळे बळीराजाच्या मानगुटीवर चिंतेचे ढग पसरले आहेत.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सहाय्यक प्रा. समीर काळे, चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी बाधित शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
भौतिक व यांत्रिक नियंत्रणाचे उपाय
Chiplun Finger Millet Snail Pest Outbreak आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
कृषी विभागाने शंखी गोगलगायींच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे भौतिक आणि रासायनिक उपाययोजना करण्याचे सुचवले आहे:
- अंडी व गोगलगायी नष्ट करणे: सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडलेल्या गोगलगायी आणि त्यांची साबुदाण्यासारखी अंडी हाताने अथवा चिमट्याने वेचून उकळत्या पाण्यात, साबणाच्या/मीठाच्या द्रावणात टाकावीत किंवा ३ फूट खोल खड्ड्यात पुरून त्यावर चुना टाकून नष्ट करावीत.
- सापळा तयार करणे: गोगलगायी पोत्यात भरून त्यावर मीठ किंवा चुन्याची पावडर टाकावी. सायंकाळी शेतात ७-८ मीटर अंतरावर गवताचे ढीग किंवा गुळाच्या द्रावणात भिजवलेली गोणपाटाची पोती ठेवून सकाळी त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्यात.
- राख व मोरचूद: पिकाच्या चोहोबाजूंने २ मीटर रुंदीच्या राखेच्या पट्ट्यावर मोरचूद अधिक चुना (२:३) यांचा पातळ थर द्यावा.
रासायनिक उपाययोजना आणि एकत्रित मोहिमेचे आवाहन
रासायनिक उपाययोजना करताना दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. पिकाच्या बांधाच्या आतील बाजूस मेटाल्डिहाईड २.५ टक्के (स्नेलकिल) या औषधाच्या गोळ्या ५ ते ७ फूट अंतरावर टाकाव्यात. हे औषध गोगलगायींना आकर्षित करते आणि गोळीचे सेवन केल्यानंतर त्या नियंत्रणात येतात.
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखून तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषतः सकाळी ६ ते ८ या वेळेत नियमित पाहणी करून गोगलगायी व त्यांचे आश्रयस्थान नष्ट करावे. एका एकट्या शेतकऱ्याने उपाय करण्याऐवजी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे उपाययोजना केल्यास या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 05-09-2026














