इंग्रजी व गणिताच्या तुलनेत राजभाषा मराठी विषयासाठी स्वतंत्र शिक्षकांची संख्या नगण्य
मुंबई:
Maharashtra Teacher Stats All In One आणि शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत एकूण १ लाख ८ हजार ९५ शाळा असून त्यात २ कोटी १५ लाख ३२ हजार ३८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या ७ लाख ४६ हजार ३७७ शिक्षकांपैकी तब्बल २ लाख ४७ हजार १२७ (सुमारे अडीच लाख) शिक्षक एकाच वेळी सर्व विषय शिकवणारे म्हणजेच ‘ऑल इन वन’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंग्रजी-हिंदीच्या तुलनेत माय मराठीची उपेक्षा
Maharashtra Teacher Stats All In One आणि विषयनिहाय शिक्षकांची आकडेवारी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा उत्सव साजरा होत असताना, प्रत्यक्षात शाळांमध्ये ‘माय मराठी’ शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकांची प्रचंड कमतरता आहे.
- इंग्रजी शिक्षक: ८१ हजार ७१६
- गणित शिक्षक: ७९ हजार ८०२
- विज्ञान शिक्षक: ५८ हजार ५१
- हिंदी शिक्षक: ४३ हजार ७३१
- मराठी शिक्षक: अवघे ११ हजार ३३७ (केवळ १.५२ टक्के)
राजभाषा मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्रपणे नियुक्त शिक्षकांची संख्या इतर सर्व प्रमुख विषयांच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याने मराठी भाषेच्या अध्यापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हानिहाय शिक्षकांची स्थिती आणि माध्यमिक स्तरावरील ओढाताण
शिक्षकसंख्येच्या आकडेवारीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७८ हजार ३३ शिक्षक कार्यरत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे (५०,४१५), नाशिक (४०,६५७), मुंबई (३७,७६६), नागपूर (३२,८००), छत्रपती संभाजीनगर (३२,१७९) आणि अहिल्यानगर (३०,९९५) यांचा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी शिक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्यात (५,७०१) असून भंडारा (६,७००), गडचिरोली (७,८५२), वर्धा (७,९८६) आणि हिंगोली (८,२२६) या जिल्ह्यांमध्ये शिक्षकसंख्या दहा हजारांपेक्षा कमी आहे.
‘ऑल इन वन’ शिक्षकांचा ताण आता केवळ प्राथमिक स्तरापुरता मर्यादित नसून माध्यमिक स्तरावरही पसरत आहे. संचमान्यतेतील अटींमुळे मंजूर पदे कमी होणे आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या रिक्त जागांवर नवी भरती न होणे, यामुळे शिक्षकांवर मूळ विषयाव्यतिरिक्त इतर विषय शिकवण्याची पाळी येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 05-09-2026














