लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संशयिताच्या मालमत्तेची व संपत्तीची चौकशी होणार
चिपळूण:
Chiplun Bribe Case आणि लाचखोरीच्या घटनांमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला चिपळूणचा मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्ता आणि संपत्तीची सखोल चौकशी केली जाणार आहे.
रद्द झालेली फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मागितली लाच
Chiplun Bribe Case आणि घटनेचा सविस्तर क्रम
तक्रारदाराने मौजे चिपळूण येथील भूमापन क्रमांक १७४/१अ ही जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव दाखल होऊन फेरफार मंजूर व्हावा, यासाठी त्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. ग्राम विकास अधिकाऱ्यांनी ११ जून २०२६ रोजी फेरफार नोंद घातली होती; मात्र मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के याने ८ जुलै २०२६ रोजी ही नोंद रद्द केली.
यानंतर तक्रारदाराने २ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचारी पतसंस्थेत राजेशिर्के याची भेट घेतली असता, रद्द झालेली फेरफार नोंद पुन्हा मंजूर करण्यासाठी त्याने १० हजार रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली. पुढे २३ व २७ ऑगस्ट रोजी फोन करून फेरफार नोंद मंजूर केल्याचे सांगत त्याने लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला होता.
कारमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
सततच्या तगाद्याला कंटाळून तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी सायंकाळी सापळा रचला. तक्रारदाराच्या गाडीत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने उमेश राजेशिर्के याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 05-09-2026














