महामार्ग, रेल्वे स्थानके आणि मुख्य चौकांत १० ते २६ सप्टेंबरदरम्यान आरोग्य विभाग तैनात; प्रवाशांना त्वरित प्राथमिक उपचार
गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत आरोग्य पथके सज्ज झाली असून, कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे कार्यरत झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग, मुख्य चौक आणि रेल्वे स्थानकांवर मिळून एकूण १६ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही आरोग्य पथके २४ तास अहोरात्र सेवा देणार आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन प्रवाशांची तपासणी आणि त्वरित प्राथमिक उपचारांची सोय या नाक्यांवर उपलब्ध करण्यात आली आहे.
सध्या वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात सर्दी, ताप तसेच डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि इतर शहरी भागांतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व ठिकाणी पेंडॉल उभारणीचे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे चाकरमान्यांच्या आगमनासोबतच त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यानही ही आरोग्य यंत्रणा पूर्ववत कार्यरत राहणार आहे.
तालुकानिहाय रचनेचा विचार केल्यास, चिपळूण तालुक्यात सर्वाधिक ६ ठिकाणी तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये पेढे सवतसडादर्शन (पेंडॉल), कळंबस्ते तिठा (पेंडॉल), बहादुरशेख नाका (पेंडॉल), चिपळूण रेल्वे स्टेशन, अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट) आणि दहिवली फाटा (पेंडॉल) या ठिकाणांचा समावेश आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची तपासणी सहज व्हावी, यासाठी या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
उत्तर रत्नागिरीतील प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात ३ ठिकाणी आरोग्य नाके सुरू करण्यात आले आहेत. भरणे नाका (पेंडॉल), दाभीळ फाटा (पेंडॉल) आणि खेड रेल्वे स्टेशन येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक तैनात असेल. संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर एस.टी. स्टॅण्डजवळील पुलाखाली (पेंडॉल) आणि देवरूख मुर्शी (चेकपोस्ट) अशा २ ठिकाणी तपासणीची सोय करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुक्यात हातखंबा तिठा (पेंडॉल) आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन या २ महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य पथके २४ तास कार्यरत राहतील. लांजा तालुक्यात वेरळ (पेंडॉल) आणि कुवे गणपती मंदिरासमोर (पेंडॉल) या २ ठिकाणी चाकरमान्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल. तर दक्षिण रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात राजापूर एस.टी. स्टॅण्ड (पेंडॉल) येथे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
“कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून आजारी व्यक्तींवर वेळीच प्राथमिक उपचार केले जातील, जेणेकरून सणादरम्यान आरोग्य विषयक समस्या उद्भवणार नाहीत,” अशी अधिकृत माहिती रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 10-09-2026















