Guhagar House Fire: गुहागर-खालचापाट येथे भीषण आग; ६ तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वृद्धांसह कुटुंबीय बालंबाल वाचले, १३ लाखांचे नुकसान

मध्यरात्री १.३० वाजता लागली आग; आरजीपीपीएल व कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाने दोन तासांत मिळवले आगीवर नियंत्रण

Guhagar House Fire News मुळे गुहागर शहरात खळबळ उडाली आहे. गुहागर तालुक्यातील गुहागर-खालचापाट येथे मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास सचिन बामणे व संतोष बामणे यांच्या संयुक्त घराला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत संपूर्ण घर भस्मसात झाले असून अंदाजे १३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, परिसरात गप्पा मारत बसलेल्या सहा स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे घरातील दोन वयोवृद्धांसह सर्व सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मंगळवारी (दि. ८) रात्री कानडे यांच्या घराबाहेर वेदांग कनगुटकर, विराज शिंदे, शुभम शिंदे, धनराज ओक, स्वानंद दिक्षित आणि आर्य खोत हे सहा तरुण गप्पा मारत बसले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांना सचिन बामणे यांच्या घराच्या माळ्यावर अचानक उजेड दिसला. पाहणी केली असता माळ्यावर आगीचा भडका उडाल्याचे आणि पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या काचा फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणांनी तातडीने बामणे यांच्या घरामागे राहणारा मुलगा धीरज याला फोन करून उठवले. त्यानंतर सर्वांनी मिळून घरातील दोन वयोवृद्ध व्यक्तींसह इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढले आणि इतर ग्रामस्थांनाही मदतीसाठी गोळा केले.

Guhagar House Fire News Rescue Operation : अग्निशमन दलाचे २ तासांचे अथक प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच आरजीपीपीएल (RGPPL) आणि कोकण एलएनजीच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तास अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या मदतकार्यात स्थानिक नगरसेवक राजेंद्र भागडे यांनी पाण्याचा पुरवठा करून महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

Ronic

आगीची माहिती मिळताच गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीता मालप, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी तसेच सीआयएसएफच्या (CISF) जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली आणि पीडित कुटुंबाला धीर दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 10-09-2026