Ratnagiri Investment Fraud Case : गुंतवणुकीवर ५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून पावणेचार कोटींची फसवणूक; टीडब्लूजे कंपनीच्या ३ संचालकांना अटक

शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई; गुहागर आणि कुडाळ येथील संशयितांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Ratnagiri Investment Fraud Case मुळे रत्नागिरी आणि कोकण परिसरात खळबळ उडाली आहे. गुंतवणुकीवर तीन ते पाच टक्के परताव्यासह एका वर्षात मूळ रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘टीडब्लूजे लर्निंग सोल्युशन’ (TWJ Learning Solution) कंपनीच्या तीन संचालकांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. मे २०२६ मध्ये या कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (वय ३६, दोघे रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. ठाणे येथील कारागृहातून ताबा घेतल्यानंतर या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ratnagiri Investment Fraud Case Modus Operandi : आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

टीडब्लूजे लर्निंग सोल्युशन ही कंपनी सुभाष नार्वेकर (रा. माणगाव, ता. रायगड) याने सुरू केली होती. कंपनीत ९ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३ टक्के, १० लाखांवर ४ टक्के आणि २५ लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के व्याजाचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. तसेच वर्षाच्या शेवटी सर्व मुद्दल रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

कोल्हापुरातील कावळा नाका येथील एका इमारतीत संशयित समीर नार्वेकर याने कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. तेथे जवळपास २ कोटी ५३ लाख रुपयांची गुंतवणूक जमा करण्यात आली होती. त्यावरील १ कोटी ३८ लाख ७२ हजार रुपयांचा परतावा देणे बाकी होते. अशी एकूण ३ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक करून सर्व संचालक पसार झाले होते.

या प्रकरणी समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, चिन्मय पालकर, विजय पताडे (रा. राधानगरी), निखिल सुर्वे आणि अमित बालम यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित पवार यांच्या पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन ही कारवाई केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 10-09-2026