रत्नागिरीतील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा; डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे रक्ताची मागणी वाढली

रत्नागिरीतील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा; डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे रक्ताची मागणी वाढली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे रक्तदात्यांना पुढे येण्याचे तातडीचे आवाहन; एका रक्तदानामुळे वाचू शकतो रुग्णाचा जीव

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी (सिव्हिल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रक्ताची मागणी प्रचंड वाढली असून, त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रक्तपेढीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रक्तपेढीकडून नागरिकांना तातडीचे आवाहन

डेंग्यू तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार वेळेवर आणि पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील निरोगी व रक्तदान करण्यास पात्र असलेल्या सर्व सुजाण नागरिकांनी शक्य तितक्या लवकर रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे, अशी कळकळीची विनंती प्रशासनाने केली आहे.

आपले एक रक्तदान ठरू शकते जीवनदायी

सध्या रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी नागरिकांचे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. आपले एक रक्तदान एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचवू शकते, या भावनेतून रत्नागिरीकरांनी या जीवनदायी कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तपेढी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.