फिर्यादीकडून घेतले १.१० कोटींहून अधिक रुपये; नातेवाईकांना दिली मंत्रालयातील नोकरीची बनावट नियुक्ती व मुलाखतीची पत्रे, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील एका ४९ वर्षीय नागरिकाला प्रसिद्ध ‘झुडिओ’ (Zudio) कपड्यांची फ्रँचायझी मिळवून देण्याचे तसेच त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर व क्लार्क पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी १० लाख १ हजार ०८३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परटवणे येथील आकाश प्रकाश रसाळ याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झुडिओ फ्रँचायझीच्या नावाखाली उकळले तब्बल १ कोटी १० लाखांहून अधिक रुपये :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रॉबीन स्टीव्हन्स सोन्स (वय ४९ वर्षे, रा. मयुरेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०३, दुसरा मजला, जयस्तंभ, रत्नागिरी) आणि आरोपी आकाश प्रकाश रसाळ (रा. परटवणे, सरोदेवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्यात १८ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत टॉप इन टाउन, गाडीतळ (रत्नागिरी) येथे आर्थिक व्यवहार झाले. आरोपी आकाश रसाळ याने फिर्यादी यांना आपण ‘झुडिओ’ कपड्यांची फ्रँचायझी घेऊया असे सांगून त्यांच्याकडून एकूण १,१०,२२,०५४ रुपये इतकी मोठी रक्कम घेतली. मात्र, दीर्घकाळ होऊनही आरोपीने फ्रँचायझी मिळवून दिली नाही. त्यामुळे फिर्यादींनी पैशांची मागणी केली असता आरोपीने त्यातील १२,२०,९७१ रुपये परत केले, परंतु उर्वरित ९८,०१,०८३ रुपये अद्याप परत केलेले नाहीत.
मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर व क्लार्क पदाची दिली बनावट पत्रे :
याचबरोबर आरोपीने फिर्यादीच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आणखी मोठा गंडा घातला. फिर्यादी यांची मावस बहीण विधाता किशोर भोळे (रा. ३०१, सोहम रेसिडन्सी, जोशी पाळंद, रत्नागिरी) हिला मंत्रालयात ‘डेप्युटी कलेक्टर’ म्हणून नेमणूक झाल्याचे खोटे नियुक्ती पत्र दिले. तसेच, फिर्यादी यांची दुसरी मावस बहीण पद्मश्री सचिन पेटकर आणि तिचे पती सचिन सुनिल पेटकर (रा. ७०८, संक्रमण शिबीर, म्हाडा कॉलनी, बोरीवली पूर्व, मुंबई) यांनाही मंत्रालयातील बांधकाम विभागाच्या कार्यालयात ‘क्लार्क’ पदाच्या नोकरीसाठी मुलाखत (इंटरव्ह्यू) असल्याचे खोटे पत्र दिले. या नोकरीच्या कामासाठी आरोपीने फिर्यादीकडून एकूण १५,००,००० रुपये घेतले होते. दिलेली नियुक्ती पत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पैसे परत मागितले असता आरोपीने त्यातील ३,००,००० रुपये परत केले, मात्र उर्वरित १२,००,००० रुपये परत केले नाहीत.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल :
अशा प्रकारे फ्रँचायझीचे खोटे आमिष दाखवून तसेच नातेवाईकांच्या नावाने सरकारी नोकरीची बनावट कागदपत्रे तयार करून आरोपी आकाश रसाळ याने फिर्यादी यांची एकूण १,१०,०१,०८३ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रॉबीन स्टीव्हन्स सोन्स यांनी शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आकाश प्रकाश रसाळ याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.













