निवारा शेडच्या नामफलकावर छत्रपतींचा एकेरी उल्लेख; मनसे आक्रमक, फलक न बदलल्यास आंदोलनाचा इशारा

निवारा शेडच्या नामफलकावर छत्रपतींचा एकेरी उल्लेख; मनसे आक्रमक, फलक न बदलल्यास आंदोलनाचा इशारा

महिनाभरात योग्य नामकरण न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने उत्तर देणार; उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांचा नगरपरिषदेला इशारा

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते; मात्र प्रसिद्धीच्या फलकांवर त्यांचा एकेरी उल्लेख करून अनादर केला जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या प्रवासी निवारा शेडच्या नामफलकावर छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा दावा करत, हा नामफलक येत्या महिनाभरात सन्मानपूर्वक बदलावा, अन्यथा मनसे स्वतः पुढाकार घेऊन त्याचे ‘योग्य ते नामकरण’ करेल, असा थेट इशारा मनसेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिला आहे.

"प्रसिद्धीच्या वेळी सन्मानाचा विसर का?" – मनसेचा थेट सवाल

या संदर्भात रुपेश जाधव यांनी रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनासह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात सर्वच स्तरांवर छत्रपतींच्या नावाचा वापर केला जातो, मात्र प्रत्यक्ष फलक उभारताना किंवा प्रसिद्धी करताना त्यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख सोयीस्करपणे टाळला जातो, असा तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

महिनाभराची मुदत; अन्यथा मनसे करणार योग्य नामकरण

प्रशासनाने या बाबीचे गांभीर्य ओळखून छत्रपती शिवाजी नगर येथील संबंधित निवारा शेडचा नामफलक तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या एका महिन्याच्या आत नामफलकात सन्मानपूर्वक बदल न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र भूमिका घेत त्या नामफलकाचे ‘योग्य ते नामकरण’ करण्यात येईल, असा इशारा दिल्याने या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.