गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी कु. साईश कदम यांची निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी कु. साईश कदम यांची निवड

जीएस पदासाठी रंगली चुरशीची लढत; निवडणूक प्रक्रिया शांततेत व उत्साहात संपन्न

रत्नागिरी : येथील नामांकित गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे विद्यार्थी सचिव (General Secretary – GS) पदासाठी झालेल्या निवडणुकीत कु. साईश कदम यांनी विजय मिळवत विद्यार्थी सचिवपदी बाजी मारली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्याची आणि त्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता साईश कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

अमृत गोरे यांच्याशी रंगली थेट लढत

विद्यार्थी सचिव पदासाठी एमबीए भाग १ चा विद्यार्थी कु. साईश कदम आणि एमए भाग १ चा विद्यार्थी कु. अमृत गोरे यांच्यात थेट लढत झाली. अत्यंत चुरशीच्या आणि चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करत साईश कदम यांनी बहुमताने विजय मिळवला. त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयीन वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मार्गदर्शक व निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पूर्ण

महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखरकर, प्रशासकीय उपप्राचार्य सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच उपप्राचार्य व निवडणूक निरीक्षक डॉ. कल्पना आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह डॉ. अश्विनी देवस्थळी, अमोल सहस्रबुद्धे आणि अंकित सुर्वे यांनी संपूर्ण निवडणूक कामकाज यशस्वीपणे हाताळले. विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना योग्य दिशा देऊन विकासात्मक कामे करण्याचा विश्वास नवनिर्वाचित सचिव साईश कदम यांनी व्यक्त केला आहे.