रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला आहे. शहरात कुठे जाल तिथे मोकाट गुरांचे मुख्य रस्ता किंवा आजुबाजूला बस्तान असते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन अनेक अपघात झाले आहेत; परंतु ही समस्या सोडवणाऱ्या यंत्रणांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने वाहनधारक आणि शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंपक मैदानावर उभारण्यात आलेली निवारा शेड (कोंडवाडा) हे संस्थांनी आणलेल्या जखमी गुरांचा आसरा बनला आहे; मात्र ज्या मोकाट गुरांसाठी हे शेड आहे ती मोकाट गुरे आजही मोकाटच आहेत.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रत्नागिरीतील नागरिक आणि वाहनधारक एका वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत. शहर सुंदर आणि स्मार्ट बनवण्याची धडपड लोकप्रतिनिधी करत असले तरी यंत्रणांची मानसिकता त्यामध्ये खोडा घालताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी मोकाट गुरांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून पैसे देऊन चंपक मैदानावर मोकाट गुरांसाठी निवारा शेड उभारली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने सुमारे ७३ मोकाट गुरे पकडून ती काही गोशाळा तर काही शेतकऱ्यांना दिली तरी मोकाट गुरांची संख्या काही कमी होताना दिसत नाही उलट ती वाढतच आहे. येथील एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात सुमारे २५० मोकाट गुरे आहेत.
शहरात घंटागाड्यांद्वारे दररोज कचरा गोळा केला जातो तरी काही बेशिस्त नागरिक त्या गाड्यांच्या वेळा न पाळता आपल्या वेळेप्रमाणे घराबाहेर पडून जुन्या कचराकुंड्या किंवा अन्य ठिकाणी कचरा फेकून देतात. त्यामुळे या मोकाट गुरांना ते खाद्य मिळते. परिणामी, शहरात मोकाट गुरांचा ठिय्या वाढतच चालला आहे. मोकाट गुरांना पकडून ३ दिवसात त्याचे मालक न आल्यास त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आहे; परंतु त्यालाही काही संस्था विरोध करत आहेत; परंतु मोकाट गुरे पाळणे हे पालिकेचे कामच नाही. त्यामुळे सध्या शहरातील मोकाट गुरांची समस्या वाढतच चालली आहे. जिल्हा प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी याबाबत गंभीर दखल घेण्याची गरज आहे; परंतु सर्व यंत्रणा सध्या मूग गिळून असल्याचे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:35 24-09-2024