ॲक्सिडेंटनंतर पळून गेलेल्या महाडच्या कारचालकावर खेड पोलिसांत गुन्हा; तपासात ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर भरधाव कारने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून, धडक दिल्यानंतर चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दवाखान्यात जाताना भोस्ते घाटात अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किरण संजय जंगम (रा. खोपी, श्रीरामनगर, खेड) यांचा आतेभाऊ संकेत जंगम हा आपल्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून (MH BA 1153) आत्या नीलम चंद्रकांत जंगम (वय ५२, रा. पिरलोटे, खेड) यांना उपचारासाठी खेड येथील डॉ. साळुंखे यांच्या दवाखान्यात घेऊन जात होता.
ते चिपळूणकडून खेडच्या दिशेने जात असताना भोस्ते घाटातील वळणावर पाठीमागून वेगाने आलेल्या एका काळ्या रंगाच्या वॅगनार कारने (MH 06 CU 0843) त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
महिला गंभीर जखमी; चालक पसार
या भीषण अपघातात नीलम चंद्रकांत जंगम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, चालक संकेत जंगम याच्या डाव्या पायाला मुकामार लागला आहे. तसेच अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर कारचालक निलेश भगवान मोरे (वय ३४, रा. कोळोसे, ता. महाड, जि. रायगड) हा मदत करण्याऐवजी कार घेऊन पसार झाला.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी १० सप्टेंबर रोजी पहाटे ६:०० वाजता खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १८४, १३४(ब) आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात डिजिटल पुराव्यांसाठी ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर करण्यात आला असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.













