अवजड वाहनांच्या तीन रांगांमुळे महामार्गावर बोजवारा; एसटी, ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहना खोळंबल्या
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने पनवेल परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पाहायला मिळाले. जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर मोठ्या प्रमाणात भीषण वाहतूक कोंडी झाली असून पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहने थेट तीन रांगांमध्ये उभी करण्यात आल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला. या कोंडीचा फटका पुलापासून तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून बसला.
जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून लाखो नागरिक कोकणाकडे रवाना होत आहेत. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढली. पळस्पे पुलाच्या परिसरात पोहोचण्यापूर्वीच शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली. या कोंडीत एसटी महामंडळाच्या विशेष बसेस, खासगी लक्झरी बस, कार आणि इतर हलकी वाहने मोठ्या संख्येने अडकून पडली होती.
अवजड वाहनांच्या ३ रांगांमुळे रस्ता ब्लॉक
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पळस्पे पुलाच्या परिसरात प्रशासनाकडून अवजड वाहने थांबवण्यात आली होती. मात्र, ही वाहने महामार्गावरच तीन रांगांमध्ये उभी राहिल्याने रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला गेला. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांचा वेग पार मंदावला आणि कोंडीची तीव्रता वाढत गेली.
चाकरमान्यांचे हाल; पोलिसांसमोर पार्किंगचे आव्हान
वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी वाहनांची संख्या वाढताच या नियोजनाचा फज्जा उडाला. रात्रीच्या वेळी लहान मुले आणि कुटुंबासह गावी जाणाऱ्या प्रवाशांना तासनतास गाडीतच ताटकळत राहावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
येत्या दिवसांत कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक वाढणार असल्याने, पळस्पे पुलाजवळ थांबणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुख्य रस्त्याव्यतिरिक्त स्वतंत्र पार्किंग किंवा नियोजित थांबा तयार करण्याचे मोठे आव्हान आता वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.













