रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि दैनंदिन आहारातील वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन
चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील फुरुस बीट अंतर्गत डेरवण धनगरवाडी येथील अंगणवाडीत ‘पोषण महाअभियाना’ंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोकणातील नैसर्गिक वरदान समजल्या जाणाऱ्या विविध रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यासाठी असलेले विशेष महत्त्व याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
रानभाज्यांचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे
कोकण परिसरात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांमध्ये असणारे पौष्टिक घटक, त्यांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचे फायदे तसेच आरोग्य जपण्यासाठी त्यांचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना कोकरे जि. प. गटाचे विद्यमान सदस्य संजय कदम यांनी अशा प्रकारचे आरोग्यविषयक अभियान सातत्याने राबवण्याची गरज व्यक्त केली. सामान्य नागरिकांना या अभियानांचा अधिकाधिक लाभ व्हावा व समाजाचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक मान्यवर व अधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला कुटरे पंचायत समिती सदस्या मनस्वी बैकर, अंगणवाडी सुपरवायझर रेखा कांबळे, डेरवण तंटामुक्त अध्यक्ष संदेश चव्हाण, संतोष घाग यांच्यासह अंगणवाडी सेविका व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













