जि. प. आरोग्य समितीच्या बैठकीत सभापती विलास चाळके यांचे निर्देश; एचपीव्ही लसीकरणाचाही घेतला आढावा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओपीडीची (OPD) संख्या वाढवावी, तसेच गणेशोत्सव कालावधीत विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती तथा उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिले आहेत.
आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना
जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या काळातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते. सणासाठी मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करावी आणि आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित (Refer) करण्याची व्यवस्था ठेवावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
एचपीव्ही (HPV) लसीकरणावर भर
बैठकीमध्ये जिल्ह्यातील एचपीव्ही लसीकरणाचा आढावाही घेण्यात आला. ९ ते १४ आणि १४ ते १५ वयोगटातील किशोरवयीन मुलींपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्यासाठी जनजागृती वाढवावी आणि एचपीव्ही लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे विलास चाळके यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.













