Lanja Waked Bridge Accident: वाकेड पुलावर दोन कारचा भीषण अपघात; तिघे जखमी

Lanja Waked Bridge Accident: वाकेड पुलावर दोन कारचा भीषण अपघात; तिघे जखमी

वॅगनआरने ट्रायबरला मागून दिली जोरदार धडक; लांजा पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव

मुंबई-गोवा महामार्गावर लांजानजीक राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकेड पुलावर शनिवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास दोन कारमध्ये भीषण अपघात घडला. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वॅगनआर कारने पुढे जाणाऱ्या ट्रायबर कारला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत.

नियंत्रण सुटल्याने वाकेड पुलावर अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कार (MH 46 AP 1974) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जात होती, तर ट्रायबर कार (MH 48 BH 8551) मुंबईवरून राजापूरच्या दिशेने येत होती. वाकेड पुलावर आले असता वॅगनआर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिने पुढील ट्रायबर कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातातील जखमींची नावे:

१. ध्रुव जितेंद्र मापारी (वय १६, रा. वेरली सडे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) – वॅगनआरमधील प्रवासी

२. उत्तम परशुराम मिस्त्री (वय ६१, रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) – ट्रायबरमधील प्रवासी

३. मंगला उत्तम मिस्त्री (वय ६०, रा. कुंभवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) – ट्रायबरमधील प्रवासी

लांजा पोलिसांचे तातडीने मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच वाकेड पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी, अंमलदार आणि जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी स्थानिक आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींपैकी दोघांना उपचारासाठी तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाकेड पुलावरील विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कदम, विष्णू मांजरेकर आणि सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.