प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार; नंदुरबारमध्ये ५०० चौरस फूट जागा देण्याचे निर्देश
मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात विशेष ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त केले जाणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नंदुरबार येथे केली.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ५०० चौरस फूट जागा
नंदुरबार येथील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित साहित्यिकांसोबतच्या संवाद व आढावा बैठकीत मंत्री उदय सामंत बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यातही तातडीने स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात किमान ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन पी., मराठी भाषा विभागाचे भाषा संचालक डॉ. अरुण गिते, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि प्रमुख साहित्यिक उपस्थित होते.
वाचन संस्कृतीला मिळणार चालना
प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या नवीन मराठी भाषा कार्यालयांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत प्रकाशित पुस्तके, दुर्मीळ ग्रंथ आणि विविध दर्जात्मक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवा पिढी आणि नागरिकांमध्ये मराठी भाषेच्या वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
बोलीभाषांचे जतन व साहित्य संमेलनांचे आयोजन
मराठी भाषेच्या प्रमाणभाषेबरोबरच विविध प्रादेशिक बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भाषा, अहिराणी तसेच स्थानिक बोलीभाषांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. भाषा आणि संस्कृती यांचा घट्ट संबंध लक्षात घेऊन आगामी काळात स्थानिक पातळीवर साहित्य संमेलने, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध भाषिक उपक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.













